
नेरळहून माथेरानला जाणाऱ्या एसटीच्या मिनीबसचे ब्रेक अचानक झाले आणि इंजिनातूनही धूर निघू लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. चालकाने प्रसंगावधान राखून घाटातील जुम्मापट्टी – वॉटरपाइप रेल्वे स्थानकादरम्यान चढावरच गाडीवर नियंत्रण मिळवत ती थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. एसटीच्या मिनीबसेस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेरळ-माथेरान या प्रवासासाठी चांगल्या दर्जाच्या बसेस द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नेरळ ते माथेरानदरम्यान एसटीची फक्त एकच मिनीबस असून त्याच्या दिवसभरात केवळ चार ते सहा फेऱ्या होतात. प्रवाशांच्या संख्येच्या मानाने या बसेस कमी पडत आहेत. मिनीबसदेखील अनेकदा रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजता नेरळ येथून माथेरानच्या दिशेने निघालेली शेवटची मिनीबस जुमापट्टी आणि वॉटरपाइप रेल्वे स्थानकादरम्यान येताच घाटातील चढावावर बंद पडली. बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. टॅक्सी व अन्य पर्यायी वाहनांनी हे प्रवासी माथेरानला पोहोचले.
एकाच बसवर प्रवाशांचा भार
माथेरानच्या घाटरस्त्यावर एसटी मिनीबस बंद पडणे, ब्रेक निकामी होणे तसेच इंजिनमधून धूर निघणे, अशा घटना सातत्याने घडत आहेत. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांचा विचार करता, अशा तांत्रिक बिघाडांकडे केवळ किरकोळ समस्या म्हणून पाहणे धोकादायक ठरू शकते, असे प्रवाशांनी सांगितले. सध्या घाटरस्त्यावर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी एकमेव मिनीबस उपलब्ध असल्याने तिच्यावर मोठा भार आहे. अशा परिस्थितीत बसची नियमित तांत्रिक तपासणी, देखभाल आणि सुरक्षिततेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारीही बस बंद पडल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागली आणि काहींना जादा पैसे खर्च करून माथेरान गाठावे लागल्याचे सांगण्यात आले.

























































