
मुंबई, ठाणे, पनवेल तसेच उल्हासनगर परिसरातील चोरीच्या गुन्ह्यात पंचविशी, चाळिशी, सेंच्युरी ठोकणाऱ्या मंचेकर टोळीचे पोलिसांनी अखेर कंबरडे मोडले आहे. विविध गुन्हे दाखल असलेल्या दिनेश मंचेकरच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. त्याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली. टोळीचा प्रमुख बाबू मंचेकरच्या नावावर तब्बल 100, मुलगा दिनेशच्या नावावर 43 तर मामा सुदेश महादेव याच्याविरोधात 25 गुन्हे नोंद आहेत. फरार बाबू मंचेकर आणि सुदेश महादेव यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
मंचेकर टोळीतील एकाच कुटुंबातील बाप, मुलगा आणि मामा अशा तिघांवर मिळून तब्बल 168 गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या गुन्ह्यांत वारंवार पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दिनेश मंचेकर याच्याविरोधात मुंबई, नवी मुंबई, घाटकोपर, ठाणे आणि पनवेल परिसरात तब्बल 43 गुन्हे दाखल आहेत. बदलापूर येथील चोरीच्या गुन्ह्यानंतर गेल्या वर्षभरापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला नवी मुंबईतून अटक केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, उपनिरीक्षक अशोक पवार, हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, मंगेश जाधव, अमर कदम, अशोक थोरवे, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, संजय शेरमाळे, अविनाश पवार, कुसूम शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लुटमारीची ‘मोडस ऑपरेंडी’
या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मंचेकर टोळीतील सराईत गुन्हेगार असणारे बाप-बेटा आणि मामा लुटमारीसाठी ‘मोडस ऑपरेंडी’ वापरायचे. हे तिघेही अनोळखी व्यक्तीला हेरायचे आणि ओळख असल्याचे भासवून गप्पांत गुंतवून त्यांच्याकडील दागिने, पैसे लंपास करायचे.
20 तोळे सोने हस्तगत
दिनेश मंचेकर याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 20 तोळे सोने हस्तगत केले. हे सोने नेमक्या कोणत्या चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच आरोपीने आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे मंचेकर टोळीच्या अन्य गुन्ह्यांचे धागेदोरेही हाती लागण्याची शक्यता आहे.



























































