प्रासंगिक – नवरात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गौरी मांजरेकर

भारतीय संस्कृतीमध्ये ‘नवरात्री’ हा अत्यंत ऊर्जेचा,भक्तीचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या या प्रवासाचा वेद, उपनिषद, पुराणे आणि विविध ऐतिहासिक कालखंडातील प्रवास खालीलप्रमाणे आहे.

भारतात स्त्राrशक्तीच्या पूजन परंपरेचे मूळ सिंधू संस्कृतीमध्ये पाहावयास मिळते.मातृदेवतेच्या मातीच्या मूर्ती किंवा चिन्हांची पूजा करण्याची परंपरा सिंधू संस्कृतीच्या काळापासून अस्तित्वात आहे. हडप्पा आणि मोहनजोदडोच्या उत्खननात मोठय़ा प्रमाणावर मातीच्या स्त्राr मूर्ती सापडल्या आहेत, ज्यांना इतिहासकार ‘आदिशक्ती’ किंवा ‘पृथ्वीमाता’ यांचे प्राचीन रूप मानतात वेदकाळात देवीची संकल्पना कोणत्याही एका मर्यादित मूर्तिरूपात नसून संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करणाऱया ‘चैतन्यशक्ती’ किंवा ‘महाशक्ती’च्या रूपात आहे. ऋग्वेदाच्या 10 व्या मंडलातील 125 वे सूक्त म्हणजेच प्रसिद्ध ‘देवी सूक्त’ होय. या सूक्ताची ऋषी (द्रष्टा) ‘वाग्देवी’ (आंभ्रणाची कन्या वाप्) ही असून ऋग्वेदातील ही ‘स्त्राr’ ऋषी असून ती स्वतः आदिशक्तीचे स्वरूप असल्याचा उच्चार करते.

केनोपनिषदातील ‘उमा हैमवती’ ही आख्यायिका असे स्पष्ट करते की,  कितीही पराक्रमी देव वा मानव असो, जोपर्यंत त्याला ‘आदिशक्ती’ची कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत अहंकारामुळे त्याचे सामर्थ्य निरर्थक ठरते. ही ‘उमा’ म्हणजेच पुढे जाऊन  दुर्गा किंवा आदिशक्तीच्या रूपाने नवरात्रीची केंद्रबिंदू बनली.

वैदिकोत्तर काळ (सुमारे इ.स.पूर्व 1000 ते इ.स.पूर्व 500) आणि प्राचीन संहितेचा काळ (स्मृतिकाल ) मानला जातो.या काळात नवरात्रीचे स्वरूप धार्मिक होण्यापूर्वी ती एक ‘ऋतुसंधी पूजा’ (पावसाळा संपून हिवाळा किंवा नवीन पीक येण्याची वेळ) होती. प्राचीन भारतात शेतीची आवर्तने आश्विन (ऑक्टोबर) आणि चैत्र (मार्च-एप्रिल) या दोन पिकांच्या ऋतुचक्रांवर आधारलेली होती. घटस्थापनेसाठी वापरली जाणारी माती ही शेतातील किंवा नदीकाठची सुपीक माती असते.घटाखाली जी नऊ धान्ये (गहू, बार्ली/ज्वारी, मूग, उडीद इत्यादी) पेरली जातात, ती नऊ दिवसांत जोमाने वाढतात. प्राचीन काळी या अंकुरांची लांबी आणि रंग पाहून आगामी वर्षातील पिकांचे अंदाज बांधले जात असत.

नवरात्रीच्या धार्मिक इतिहासाचा मुख्य आधार हा ‘मार्कण्डेय पुराणातील’ ‘देवीमाहात्म्य’, ज्याला आपण ‘दुर्गा सप्तशती’ किंवा ‘चंडीपाठ’ म्हणून ओळखतो. केवळ मार्कण्डेय पुराणच नव्हे, देवी भागवत पुराणात आदिशक्तीच्या विविध रूपांची आणि नवरात्र व्रताच्या नियमांची अत्यंत सविस्तर माहिती दिली आहे. भविष्य पुराणात नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने घटस्थापनेचे नियम, कलश स्थापना, मातीची वेदी तयार करणे आणि नऊ रूपांच्या पूजेची पद्धत सांगितली आहे.

सिंधू संस्कृतीनंतर देवीच्या मूर्ती आपल्याला कुषाण व गुप्त काळात पाहावयास मिळतात.कुषाण आणि गुप्त काळ (इ.स. 1 ले शतक ते 6 वे शतक) या काळात मूर्तिपूजेचे पहिले लिखित व शिल्पकलेचे पुरावे सापडतात. भारतामध्ये सापडलेल्या सर्वात प्राचीन मूर्तींपैकी एक देवी मूर्ती मथुरा संग्रहालयात आहे, जी इ.स.च्या 1 ल्या ते 2 व्या शतकातील (कुषाण काळ) आहे. यात देवी दुर्गा चार हातांनी महिषासुराचा वध करताना कोरलेली आहे.

पौराणिक आणि मध्ययुगीन साहित्यानुसार, प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करण्यापूर्वी लंकेवर चढाई करताना समुद्राच्या काठी नऊ दिवस आदिशक्तीची (दुर्गादेवीची) उपासना केली होती. मध्ययुगात भारतावर राज्य करणाऱया अनेक प्रमुख राजवंशांनी (जसे की राष्ट्रकूट, पल्लव, चंदेल आणि चालुक्य) दुर्गा किंवा आदिशक्तीला आपली कुलस्वामिनी मानले, ज्यामुळे नवरात्रीत होणारी देवीची पूजा आणि उत्सव यांना राजाश्रय लाभला. वेरूळ येथील प्रसिद्ध कैलास लेण्यांमध्ये (लेणी क्र. 16) आणि इतर गुहांमध्ये महिषासुराचा वध करणाऱया महादुर्गेचे प्रचंड आणि अत्यंत देखणे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प राष्ट्रकूट राजांच्या काळात (8 वे शतक) निर्माण केले गेले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे तुळजाभवानीला आपली कुलस्वामिनी मानत असत. दसऱयाच्या दिवशी ‘सीमोल्लंघन’ करून नवीन लष्करी मोहिमांची आखणी करण्याची प्रथा मराठा साम्राज्यात रूढ झाली.

आधुनिक काळात नवरात्री सण, महाराष्ट्रात घटस्थापना, गोंधळ, जोगवा आणि देवीची आराधना, महानवमीला शस्त्रपूजा, दसऱयाच्या दिवशी सरस्वती पूजन स्वरूपात, तर गुजरातमध्ये नवरात्री आणि दांडिया, गरबा स्वरूपात, बंगालमध्ये दुर्गापूजा आणि दक्षिण भारतात, तामीळनाडूमध्ये ‘बोम्मई कोलू’ (बाहुलींची मांडणी), आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये ‘बोम्माला कोलवू’ व कर्नाटकमध्ये ‘गोमबे हब्बा’ म्हणून प्रसिद्ध आहे.