
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज वाडा शहरात महाविकास आघाडीने जोरदार निदर्शने केली. ‘वोट चोर ज्ञानू गद्दी छोड’, ‘ज्ञानेश कुमारांचं करायचं काय; खाली डोकं वर पाय’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली एसआयआर मोहीम तसेच निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार याविरोधात विरोधी पक्षासह तरुणाई रस्त्यावर उतरून त्याचा राजीनामा मागत आहे. याचाच एक भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने वाडा बस स्थानकासमोर निर्दशने करून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील, प्रकाश केणे, कांतीलाल देशमुख, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद घोलप, राजेश चौधरी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, तालुका अध्यक्ष स्वप्निल ठाकरे, राजू पातकर, बाळा बाराथे, मनसेचे तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, दीपक ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भक्ती वलटे, विराज पाटील, गणेश पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.




























































