
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाची धारदार हत्या करण्यात आली होती. शिवम गायकवाड असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवमची हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळमधून मुसक्या आवळल्या आहेत. पलविंदरसिंघ चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गायकवाड आणि सिमरन नांगरे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात धरून देवासिंग शिकरवार आणि पलविंदरसिंघ चव्हाण हे दोघे शिवम आणि सिमरन यांना धमकावत होते. अखेर 20 सप्टेंबर 2024 रोजी शिवमची हत्या करून मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकून दिला होता.
शिवमचा भाऊ करण गायकवाड याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भावाच्या हत्येप्रकरणी फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी देवासिंग शिकरवार याला यापूर्वीच अटक करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र दुसरा आरोपी पलविंदरसिंघ चव्हाण हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या पथकाने चव्हाण याला मंगळवारी भोपाळ येथून अटक केली. परविंदरसिंघ हा नाव बदलून बलकारसिंह लक्ष्मणसिंह या नावाने वावरत होता. रेल्वे पोलिसांच्या एका गुन्ह्यात त्याला भोपाळ येथे अटक करण्यात आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे यांच्या पथकाने तेथे जावून पलविंदरसिंह चव्हाण यास अटक केली. यानंतर मंगळवारी रात्री त्याला नांदेड येथे आणण्यात आले. आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




























































