
सौदी अरेबियामध्ये येमेनच्या हुथी बंडखोरांकडून वाढत्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. १० ऑक्टोबर रोजी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाले आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दूतावासाने नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दूतावासाने दिलेल्या सूचनेनुसार, सौदी अरेबियातील सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी शांतता बाळगावी, सतर्क राहावे आणि विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सध्याच्या परिस्थितीशी संबंधित कोणतेही व्हिडीओ, फोटो किंवा बातम्या समाजमाध्यमांवर शेअर न करण्याचा आणि रिपोस्ट न करण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे. रियाधमधील हिंदुस्थानी दूतावास, जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास आणि त्यांची व्हीएफएस सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार असून परिस्थितीनुसार दूतावासाकडून नवीन सूचना देण्यात येतील.
अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी दूतावासाने चोवीस तास सुरू असणारी हेल्पलाइन जारी केली आहे. नागरिक सौदी अरेबियातून ८००२४७१२३४ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा +९६६-११-४८८४६९ या दूतावासाच्या संपर्क क्रमांकावर मदत मागू शकतात. याशिवाय +९६६-५३६२१६०८२ या क्रमांकावर केवळ मेसेजद्वारे व्हॉट्सॲपवर आणि [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता दूतावासाच्या अधिकृत समाजमाध्यम अकाउंटवरून मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


























































