
जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहिम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा अड्डा सापडला. या अड्ड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे. या जागेचा वापर दहशतवादी शस्त्रे आणि इतर साहित्य लपवण्यासाठी केला जात होता. या ठिकाणाहून सुरक्ष दलाने एके-47 रायफल, 30 काडतुसे, सहा ग्रेनेड, बँडेज, बॅटरी, एक टॉर्च आणि वैद्यकीय साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाला सुरानकोटच्या सजवान सेक्टरमधील साथरबन परिसरात एक गुहा सापडली. या गुहेचा वापर शस्त्रे आणि इतर वस्तू लपवण्यासाठी केला जात होता. गुहेची झडती घेतली असता आत शस्त्रे आणि दारुगोळा आढळला. यासह पुरी, चणे आणि सुका मेवा देखील सापडला. गुहेत आढळलेले ग्रेनेड बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने नष्ट केले. सुरक्षा दलांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.


























































