महिला सक्षमीकरणाचा बुलंद आवाज, सामाजिक कार्यातून परिवर्तनाचा ध्यास – अ‍ॅड. सौ. वृषाली राहुल बोंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश देशमाने

बुलढाणा – महिला सक्षमीकरण, सहकार क्षेत्र, व्यसनमुक्ती, कायदेशीर मदत, बालविकास आणि आरोग्यजागृती अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या चिखली येथील अ‍ॅड. सौ. वृषाली राहुल बोंद्रे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांच्या हक्कांविषयी जागृती करणे आणि सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरली आहे.

सहकार क्षेत्रातून महिलांना आर्थिक बळ
अ‍ॅड. वृषाली बोंद्रे यांनी बी.ए. एलएल.बी.चे शिक्षण घेतले आहे. त्या हिरकणी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चिखलीच्या अध्यक्षा आहेत. तसेच हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि अनुराधा को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर बाजार, चिखली यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतात. परमंहस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या सचिवपदी आणि सिद्धार्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी, चिखलीच्या संचालकपदीही त्या कार्यरत आहेत. महिलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान मिळावे, बचतीची सवय लागावी आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी होता यावे, यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचे माध्यम ठरते. महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक सहभाग वाढविणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ पुरस्कार’ हिरकणी महिला अर्बनला दोन वेळा मिळाला आहे. महिला सक्षमीकरण आणि दारूबंदी क्षेत्रातील कार्यासाठी ‘माँ जिजाऊ पुरस्कार’ व ‘ताराराणी शिंदे पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ तसेच महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशनचा ‘सक्षम महिला, सक्षम सहकार’ हा राज्यस्तरीय वैयक्तिक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

दारूबंदी चळवळीत महिलांचा सक्रिय सहभाग
दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे, या मागणीसाठी वृषाली बोंद्रे यांनी महिलांना संघटित करून जनजागृती आणि आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारूबंदीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. करवंड, कव्हळा, पेठ, साकेगाव, एकलारा, रायपूर, केळवद, खंडाळा मकरध्वज आणि गांगलगाव यांसह बुलढाणा, धाड व अंभोडा परिसरात महिलांच्या सभा घेऊन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. काही गावांमध्ये दारूविक्रीविरोधात पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आल्या. ३१ डिसेंबरला पुरुषांना दुधाचे वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे ६० ते ७० गावांमध्ये दारूबंदी चळवळीच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. दारूमुक्ती निर्धार परिषदेच्या माध्यमातूनही या चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न करतात. दारूबंदीचा प्रश्न हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य, महिलांची सुरक्षितता आणि मुलांचे भविष्य यांच्याशीही संबंधित आहे. त्यामुळे व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि महिलांना संघटितपणे आवाज उठविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.

महिलांना मोफत कायदेशीर मदत
विधी शिक्षणाचा उपयोग महिलांच्या हक्कांसाठी व्हावा, या उद्देशाने वृषाली बोंद्रे आणि त्यांच्या सहकारी अ‍ॅड. गीता भोजवाणी व अ‍ॅड. काछवाल यांच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य कायदेशीर सल्ला आणि मदत दिली जाते. कौटुंबिक हिंसा, अन्याय आणि महिलांच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांमध्ये योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातात. अनेकदा आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव किंवा कायद्याची अपुरी माहिती यांमुळे महिला अन्यायाविरोधात पुढे येत नाहीत. त्यांना हक्कांची जाणीव करून देणे, कायदेशीर पर्याय समजावून सांगणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. भविष्यात महिलांसाठी स्वतंत्र कायदेशीर मार्गदर्शन व कौटुंबिक समुपदेशन केंद्र सुरू करण्याचीही त्यांची योजना आहे.

बालविकास आणि शिक्षणाला प्रोत्साहन
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप करणे, अकरावी-बारावी तसेच विविध प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, असे उपक्रम राबविले जातात. हिरकणी महिला अर्बनच्या माध्यमातून अनाथ मुला-मुलींना आर्थिक मदत दिली जाते. दिवाळीच्या काळात पारधी आणि आदिवासी तांड्यांवर जाऊन मिठाई व कपड्यांचे वाटपही केले जाते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळते. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हे उपक्रम राबविले जातात. वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्नही या माध्यमातून त्या करतात.

आरोग्यजागृती आणि सांस्कृतिक उपक्रम
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी योग शिाfबरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांत सुमारे ५०० ते ६०० महिला सहभागी होतात. महिलांसाठी विनामूल्य रक्त आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिरेही आयोजित केली जातात. या शिबिरांत दरवर्षी सुमारे एक हजार ते बाराशे महिलांची तपासणी होते. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी गौरी-महालक्ष्मी सजावट स्पर्धा, मंगळागौर कार्यक्रम, पारंपरिक खेळ व गाणी, नवरात्रोत्सवातील गरबा प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करतात. उत्कृष्ट सजावट करणार्‍या महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात येते. जागतिक महिला दिनानिमित्त ‘हिरकणी सम्राज्ञी’ (मिसेस चिखली), ‘हिरकणी गॉट टॅलेंट’, ‘हिरकणी स्वप्नसुंदरी’ आणि सोलो डान्स अशा स्पर्धांमधून महिलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी देतात. या उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यास आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होते. असे त्यांचे म्हणणे आहे.