
जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंच्या कर्तृत्वाचा कल्याणच्या विजय तरुण मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. नेत्रा फडके, अंजली भिलवरे आणि देविका पॉल यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने त्यांना प्रत्येकी १० हजारांचे आर्थिक सहाय्य केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि विजय तरुण मंडळाचे प्रमुख विश्वस्त विजय साळवी यांच्या संकल्पनेतून ‘कर्तृत्वाचा गौरव व यशाला प्रोत्साहन’ हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. खेळाडूंना योग्य प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करू शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला विजय तरुण मंडळाचे अध्यक्ष नदिम आगा, मारुती नागरे, नगरसेवक विशाल गारवे, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, शहर संघटक मिनल कांबळे, उपशहर संघटक कविता देशपांडे, भागवत बैसाने आदी उपस्थित होते.
देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी
मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या नेत्रा फडके, अंजली भिलवरे आणि देविका पॉल या तीन खेळाडूंना जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे.


























































