
ओमानच्या सोहार किनाऱ्यावर 11 हिंदुस्थानी खलाशांसह ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या टँकरवर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात दोन हिंदुस्थानी खलाशी बेपत्ता झाले आहेत. नऊ जणांना सुखरूप वाचवण्यात आले असून, सध्या युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
रविवारी 11 ऑक्टोबर रोजी हा ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर टँकरमधून आगीचे प्रचंड लोळ आणि काळा धूर उसळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो जवळून जाणाऱ्या एका बोटीवरील खलाशांनी टिपला आणि ‘मरीन टँक्स’ने ‘एक्स’वर शेअर केला आहे. दरम्यान, बेपत्ता हिंदुस्थानी जवानांच्या सुरक्षित सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून स्थानिक यंत्रणांसोबत सतत समन्वय साधला जात असल्याचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे.
ओमानच्या किनारपट्टी आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी ऑन पीस’ या जहाजावर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना शस्त्राने हल्ला झाला होता. त्या जहाजावर 19 क्रू सदस्य होते, ज्यापैकी 17 हिंदुस्थानी कर्मचारी होते. या हल्ल्यात 11 हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांसह 12 क्रू सदस्य ज जण जखमी झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाने या सातत्यपूर्ण हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली असून सागरी व्यापार आणि जहाजांची सुरक्षा तातडीने पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे.


























































