
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या दडपशाहीवर ताशेरे ओढले. मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या राजीनाम्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मात्र केवळ राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. तर यंत्रणेत बदल आणला पाहिजे. सशक्त लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, जंतरमंतरवर एक 14 वर्षाचा मुलगा एकटाच चालला होता. त्याला पोलिसांनी जायला मज्जाव केला. त्यावेळी त्याने तुम्हाला कलम 144 माहीत आहे का? असा सवाल पोलिसांना केला. मी एकटा चाललोय. मला कोणी थांबवू शकत नाही, असं तो मुलगा म्हणाला. कायद्यानुसार तुम्ही मला अटक करू शकत नाही, असं तो पोलिसांना सांगत होता,तुम्ही एकट्या मुलाला का अटक करत आहात? दिल्ली पोलिसांच्या मनात काय आहे कळत नाही, देश आणीबाणीच्या दिशेने चालला का हे दिसत आहे, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारची नैतिकता संपली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तरीही तुमच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यावेळी नैतिक जबाबदारी घ्यावी की नाही? सत्ताधाऱ्यांची नैतिकता संपलीय का? जनता सरकार दरबारी न्याय मागत आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. राष्ट्रपतींकडे न्याय मागितला, पण मिळाला नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी व्होट चोरी झाली आहे, यावर मी ठाम आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या, मग व्होट चोरी कशी झाली? असं सत्ताधारी मला विचारतात. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, या व्होट चोरीची माझ्या मतदारसंघापासून चौकशी सुरू करा. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 2 लाख 50 हजार मतदार गायब झाले आहेत. हे मतदार गेले कुठे? या समोर, चर्चा करा, मी चर्चेला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
केवळ राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. तर यंत्रणेत बदल आणला पाहिजे. सशक्त लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. आम्ही चर्चेला तयार आहोत. समोरचे कुठे तयार आहेत?,बेरोजगारी वाढली हे देशाचा डेटा सांगतो, महागाई वाढली हे देशाचा डेटा सांगतोय. व्होट चोरी झालीय हा डेटा सांगतोय, तुम्ही दुष्काळ रोजच दाखवत आहात. एवढी आव्हाने असताना सत्ताधारी त्यावर काही करताना दिसत नाहीत. सत्ताधारी चर्चेला का तयार नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

























































