क्रशर प्लांटचा वाद विकोपाला गेला, राजस्थानचे माजी आमदार अतर सिंग भडाना यांची जमावाकडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रशर प्लांटवरून झालेल्या वादातून राजस्थानच्या बयाना येथील माजी आमदार अतर सिंग भडाना यांची जमावाने मारहाण करत हत्या केली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकरी आणि भडाना यांच्यात वाद झाला. या वादातून हा हल्ला झाला. यात भडाना गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी 6.30 वाजता अतर सिंग भडाना यांचा गावकऱ्यांशी क्रशर प्लांटवरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि 70 ते 80 जणांनी हल्ला केला. गावकऱ्यांनी काठ्या आणि दगडांनी भडाना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भडाना यांच्यासह त्यांचे सहकारी गगन शर्मा हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही सुरुवातीला वैरा उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने भडाना यांना जयपूरला आणि गगन शर्मा यांना भरतपूरला हलवण्यात आले. जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात उपचारादरम्यान भडाना यांचे निधन झाले.

या घटनांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला नियमितपणे दिली जात होती, परंतु कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप भडाना यांच्या पत्नी कमलेश यांनी केला आहे. पोलीस ठाणे प्रभारी धीरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.