
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. एका आदिवासी महिलेला तिचे लहान मूल पोटाशी धरून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्या लहान मुलासह तिला फरफटत नेऊन व्हॅनमध्ये कोंबले. या देशाच्या लोकशाहीच्या नावाखाली नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही क्रूरता आणलेली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशातील लोकशाही किती क्रूर पद्धतीने राबवली जातेय, हे आता महाराष्ट्र आणि देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समजायला हवे, अशी टिका संजय राऊत यांनी केली
देशाची लोकशाही आज धोक्यात आली आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्यांना काय वेड लागले आहे का? असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, रविवारी मुंबईत हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि पोलीस स्टेशनसमोर जमा झाले. परवा मी आदित्य ठाकरेंपोबत स्वतः होतो, जिथे तुषार गांधी यांना अटक करून नेण्यात आले. या घटनेवर जे उलटे प्रश्न विचारत आहेत, त्या वृत्तपत्रांची आणि माध्यमांची डोकी तपासायला हवीत, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
आदित्य ठाकरेंसोबत इतर नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर बोलताना ते म्हणाले की, ‘गुन्हे होऊ देत, आदित्य ठाकरे हे लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे, आमचे शिवसैनिक, तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमोर पोलिसांचा हा क्रूर चेहरा आता उघडा पडला आहे. लहान मूल पोटाशी असलेल्या त्या आदिवासी महिलेला ज्या प्रकारे फरफटत नेण्यात आले, तो फोटो मी स्वतः ट्विट केला असून देशाच्या प्रत्येक वृत्तपत्राने तो पहिल्या पानावर छापला पाहिजे’.
आज होणाऱ्या मोर्च्यामध्ये इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. आम्ही सर्वजण इथे आलो आहोत आणि मुंबईत दिल्लीच्या तोडीचे आंदोलन सुरू आहे. योग्य वेळ आल्यावर उद्धव ठाकरे स्वतः तिथे येतील; ते कधी येणार आणि कोणत्या क्षणी येणार, हे आम्ही ठरवू. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील आंदोलनाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक पोलीस स्टेशनबाहेर जमा होत आहेत, पोलिसांना जाब विचारत आहेत आणि त्यांच्या गाड्या अडवत आहेत. यापेक्षा अत्यंत तीव्र आंदोलन कुठे झालेलं नाही असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.




























































