
अर्जेंटिनाच्या निळय़ा-पांढऱया जर्सीला भावूक निरोप दिल्यानंतर अवघ्या चार दिवसांत लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानावर उतरला आणि त्याने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतरही या महान खेळाडूच्या पायातील जादू कायम असल्याचा प्रत्यय मेजर लीग सॉकरमध्ये आला. मेस्सीने इंटर मियामीकडून डीसी युनायटेडविरुद्ध दोन गोल झळकावत संघाला 4-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला.
नू स्टेडियमवर रंगलेल्या या लढतीत अनुभवी लुईस सुआरेझने पहिल्या सत्रात दोन गोल करत इंटर मियामीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर दुसऱया सत्रात मेस्सीने सूत्रे हाती घेतली. 47व्या मिनिटाला सुआरेझच्या अचूक पासवर त्याने चेंडू गोल जाळय़ात धाडला. त्यानंतर वैयक्तिक कौशल्याची झलक दाखवत प्रतिस्पर्धी बचावफळीला चकवले आणि आणखी एक गोल नोंदवला. सुआरेझ आणि मेस्सी यांच्या जबरदस्त समन्वयापुढे डीसी युनायटेडचा बचाव पूर्णपणे निष्प्रभ ठरला
या दोन गोलांसह मेसीच्या यंदाच्या एमएलएस हंगामातील गोलांची संख्या 23 वर पोहोचली असून, गोल्डन बूटच्या शर्यतीत त्याने आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. सलग तिसऱयांदा लीगचा सर्वोत्तम खेळाडू अर्थात एमव्हीपी पुरस्कार जिंकण्याच्या दिशेनेही त्याची वाटचाल सुरू आहे. अर्जेंटिनासाठी 21 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा भावूक शेवट केल्यानंतर मेस्सीने क्लब फुटबॉलमध्ये केलेले हे पुनरागमन इंटर मियामीसाठी मोठे बळ ठरले आहे. आंतरराष्ट्रीय निरोप म्हणजे फुटबॉलमधील जादूचा शेवट नव्हे, हेच मेस्सीने आपल्या दोन गोलमधून दाखवून दिले.


























































