
हिंदुस्थानचा 24 वर्षीय नेमबाज उदयवीर सिद्धूने आयएसएसएफ रायफल/पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम फेरीत 240.6 गुणांची दमदार कमाई करत उदयवीरने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि हिंदुस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
सुवर्णपदकासाठीची झुंज अखेरच्या क्षणापर्यंत रंगली. जर्मनीच्या ख्रिश्चन रिट्झने 240.1 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. उदयवीर आणि रिट्झ यांच्यात अवघ्या 0.5 गुणांचा फरक होता. इटलीच्या पाओलो मोन्नाने 219.8 गुणांसह कांस्यपदक पटकावले.
पात्रता फेरीत चौथा, अंतिम फेरीत सोनेरी यश
पात्रता फेरीत 585-19 एक्स गुणांची नोंद करत उदयवीरने चौथे स्थान मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र निर्णायक लढतीत त्याने आपला खेळ उंचावत सर्वोच्च स्थान पटकाविले. हिंदुस्थानच्या जोनाथन गेविन अँथनीने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळविले, मात्र तो केवळ रँकिंग गुणांसाठी स्पर्धेत उतरला असल्याने पदकासाठीच्या अंतिम फेरीत त्याचा समावेश नव्हता.


























































