दिव्याच्या पाणी योजनेसाठी 212 कोटी खर्च करूनही नळाला टिपूस नाही; सत्ताधारी, प्रशासनाला शिवसेनेने विचारला जाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठा गाजावाजा करून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दिव्यातील पाणी योजनेचा शुभारंभ केला. त्यासाठी प्रशासनाने 212 कोटी रुपये खर्च केले. तरीदेखील दिवावासीयांच्या नळाला अद्यापि पाण्याचा टिपूसही आलेला नाही. मग एवढे पैसे गेले कुठे, असा संतप्त सवाल शिवसेनेने सत्ताधारी व प्रशासनाला केला आहे. ऑक्टोबर हिटचे चटके बसू लागताच दिव्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली आहे.

2023 मध्ये दिव्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल, अशी आशा नागरिकांना होती. पण प्रत्यक्षात आजही पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 27, 28 व 29 मधील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौरांना निवेदन दिले होते. पण ही वेळ त्यांच्यावर का आली, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.

कृती आराखड्याची गरज

212 कोटी रुपये खर्चुनही जर नळातून पाणी येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन नेमके कसले केले, असा प्रश्न विचारतानाच रोहिदास मुंडे यांनी दिव्यासाठी कृती आराखडा आखण्याची मागणी केली आहे. पाणी योजनेसाठी खर्च केलेला निधी, पूर्ण झालेली कामे आणि प्रत्यक्षात किती पाणी मिळाले या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना निवेदनही देण्यात येणार आहे.