
महिनाभरापूर्वी पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला होता. या पुरात अनेकांचे बळी गेले असल्याची घटना ताजी असतानाच नेपाळला पुन्हा पुराचा तडाखा बसला आहे. नेपाळच्या गोरखा जिह्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा प्रवाह एवढा तीव्र होता की, त्यामुळे बुढी गंडकी नदीचे तीन पूल वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक घरांचे आणि सार्वजनिक वस्तूंचे नुकसान झाले.
नेपाळच्या चुमनुब्री गावाजवळ असलेल्या डोंगरावरील दरड कोसळल्याने बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडल्यामुळे नदीच्या खालच्या भागात पाण्याचा प्रवाह अचानक वाढून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरामुळे गोरखा जिह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर आणि प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नदीच्या जवळ जाणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके स्थानिकांच्या मदतीने काम करत आहेत. तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
26 ऑगस्टला विनाशकारी महापूर
26 ऑगस्ट रोजी नेपाळला महापुराचा मोठा फटका बसला. भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुरामुळे रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिह्यांना मोठा फटका बसला. या महापुरात 1403 मृत्यू तर सहा हजारहून अधिक जण बेपत्ता होते. त्यानंतर 24 ते 28 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसामुळे नेपाळच्या विविध भागांत पुन्हा पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. या अतिवृष्टीत 30 जणांचा मृत्यू झाला, 15 जण जखमी झाले, तर तीन जण बेपत्ता झाल्याचे नेपाळ रेडक्रॉस सोसायटीच्या अहवालातून समोर आले होते




























































