
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व आंदोलनांचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावरच आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरला निदर्शनांसाठी राखीव असलेल्या ठिकाणांच्या यादीतून वगळले असून, त्याऐवजी तीन नव्या पर्यायी जागा निश्चित केल्या आहेत.
दिल्ली पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांच्या स्वाक्षरीने ११ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील स्थायी आदेश जारी करण्यात आला. या नव्या आदेशानुसार, दिल्लीतील आंदोलने आणि जाहीर सभांसाठी रामलीला मैदान, बुरारी मैदान, पूर्व दिल्लीतील सीबीडी (CBD) मैदान ही तीन ठिकाणे अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहेत
२८ एप्रिल २०२२ च्या आदेशात बदल
पोलिसांनी यापूर्वी २८ एप्रिल २०२२ रोजी जारी केलेल्या आदेशात सुधारणा करून जंतरमंतरचा आंदोलनासाठीचा दर्जा रद्द केला आहे. नव्याने घोषित केलेल्या या तिन्ही जागांवर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढण्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (SOPs) स्वतंत्रपणे जारी केली जातील, असेही दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




























































