दिल्ली मेट्रोत ज्येष्ठ नागरिकांच्या राखीव सीटवरून वाद; माजी IAS अधिकाऱ्यासह मुलाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली मेट्रोमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या सीटवरून झालेल्या वादात एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पवन शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी माजी IAS अधिकारी संजय प्रताप सिंह आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्थानकावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या सीटवरून शर्मा यांचा दोन्ही आरोपींसोबत वाद झाला. या वादादरम्यान शर्मा यांनी कानाखाली मारून ढकलण्यात आले. त्यामुळे शर्मा खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेतून लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर शर्मांच्या आई दुर्गा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 3(5) (सामाईक हेतू) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संजय प्रताप सिंह आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यांना अटक केली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय प्रताप सिंह हे माजी IAS अधिकारी असून, कथित लाचखोरीच्या प्रकरणात त्यांना यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली होती. त्यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह हा सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो. दरम्यान, मेट्रोमधील वाद नेमका कसा सुरू झाला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे शर्मांचा मृत्यू कसा झाला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.