
अंगात महिलांचा गाऊन आणि चेहऱ्यावर मास्क बांधून चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. चोरी केल्यानंतर या चोरट्यांनी अॅम्ब्युलन्समधून पळ काढला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही फिल्मी स्टाईल चोरी घडली असून, चोरटे एटीएममधून मोठी रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत.
कामारेड्डी-बांसवाडा मुख्य रस्त्यावरील गांधारी मंडळ मुख्यालयाजवळ हे एटीएम केंद्र आहे. रविवारी पहाटे १:०० ते १:३० च्या दरम्यान अज्ञात चोरटे एका अॅम्ब्युलन्समधून घटनास्थळी आले. ओळख पटू नये म्हणून या चोरांनी अंगात नाईटी घातली होती. त्यांनी एटीएम मशीनची तोडफोड केली आणि आतील रोकड लंपास करून त्याच अॅम्ब्युलन्सने तिथून पोबारा केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि फॉरेन्सिक ‘क्लूज’ पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. चोरीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिस फुटेज तपासून आरोपींचा माग काढत आहेत.
एटीएममधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली आहे, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. या विचित्र आणि नियोजनबद्ध चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
























































