Delhi Protest News – आंदोलनाचे ठिकाण बदलल्याने सरकार वाचणार नाही, अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर निवडणूक अनियमिततेचा आरोप करत ते म्हणाले की, “केवळ आंदोलनाचे ठिकाण बदलल्याने सरकार स्वतःला वाचवू शकणार नाही. लोकशाही वाचवणे ही आमची जबाबदारी आहे.”

निवडणूक प्रक्रियेतील एसआयआर, मतदानातील गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात इंडिया आघाडीतील पक्षांनी दिल्लीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुरक्षेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलनाची परवानगी रद्द केली आणि निदर्शनांसाठी शहरात ३ नवीन ठिकाणे निश्चित केली. सरकारच्या याच निर्णयावर अखिलेश यादव यांनी कडाडून टीका केली आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढत आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. सरन्यायाधीशांची भेट घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सरकारने दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले असले तरी, संविधानाच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.