
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या 30 व्या वार्षिक कीडा स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालय आणि परिमंडळ दोनच्या संघांनी बाजी मारली आहे. या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी झाले होते. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुष गटात सुजित पाटील आणि महिला गटात श्रद्धा जाधव यांना गौरवण्यात आले. हा क्रीडा महोत्सव कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन दिवस सुरू होता. खाकी वर्दीतल्या शिलेदारांनी मैदान मारले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्रीडा स्पर्धेत यंदा पुरुष गटात आठ सांघिक आणि नऊ वैयक्तिक तर महिला गटांमध्ये नाच सांघिक आणि नऊ वैयक्तिक क्रीडा नकारांचा समावेश करण्यात आला होता. हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, खो खो, कुस्ती, ज्युदो, अॅथलेटिक्स, धावणे, चालणे या क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 88 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत पोलीस मुख्यालय संघ आणि परिमंडळ दोनच्या संघाने विशेष बाजी मारली. स्पर्धेचा शुभारंभ पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते झाला. बक्षीस वितरण नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, सहआयुक्त दीपक साकोरे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आदी उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन दंताळ यांनी प्रथम तर देविदास कठाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पाच किलोमीटर चालणे प्रकारात जगदीश शेलकर हे प्रथम तर शांताराम वाघमोडे हे द्वितीय, महेश सरतापे तृतीय आले. सात किलोमीटर चालणे प्रकारात संजय जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.



























































