
तेलंगणात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून 21 वर्षीय तरुणाने जन्मदात्या आईला जिवंत जाळले. कार्रे दुर्गेश असे आरोपी मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्गेश हा रिक्षाचालक असून दहा दिवसांपूर्वीच हैदराबादहून आपल्या गावी परतला होता. दुर्गेशची आई कार्रे सायम्मा ही शेतमजुरी करत होती. आपली आई जादूटोणा किंवा तंत्र-मंत्रासारखे विधी करत असल्याचा आरोप दुर्गेशने केला होता आणि गावातील काही वर्षांपूर्वी झालेल्या अनेक मृत्यूंसाठी तिला जबाबदार धरले होते, असे म्हटले जात आहे.
पोलीस तपासात संबंधित महिलेचा अशा कोणत्याही कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. आरोपीला व्यसनाची सवय असून मद्यधुंद अवस्थेत त्याने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

























































