अलिबागचा अनाथ ‘राम’ आता ‘माल्टा’वासी होणार, युरोपातील नव्या आईबाबांनी घेतले दत्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनाथ मुलगा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात सहानुभूतीची भावना असते. त्या मुलाचे भविष्य कसे असेल.. तो पुढे काय करील याबाबत सर्वच अस्पष्टता असते. मात्र अलिबागच्या शिशुगृहातील ‘राम’च्या नशिबाचे दार उघडले आहे. हा राम आता लवकरच युरोपातील ‘माल्टा ‘वासी होणार आहे. नव्या आईबाबांनी त्याला दत्तक घेतले असून आज मोठ्या उत्साहात शिशुगृहात दत्तक विधानसोहळा पार पडला. लाडक्या रामचे उपस्थित महिलांनी औक्षण करून त्याला शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील वात्सल्य ट्रस्ट संचालित अलिबाग येथे शिशुगृह असून त्याठिकाणी अनेक निराधार लहान मुली व मुले आहेत. तेथे त्यांचे संगोपन केले जाते. याठिकाणी राम नावाचा चिमुकलादेखील होता. युरोपच्या ‘माल्टा’ या देशात राहणाऱ्या एका जोडप्याने ट्रस्टशी संपर्क साधला. तसेच रामबद्दलची माहितीही मिळवली. त्याचा फोटो बघितला तेव्हाच ते जोडपे त्याच्या प्रेमात पडले, त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया व औपचारिकता पूर्ण केली. ती पूर्ण झाल्यानंतर ‘राम’ला दत्तक देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला.

भविष्य उज्ज्वल होणार

वात्सल्य ट्रस्ट ही संस्था अनाथ, निराधार व गरजू बालकांना सुरक्षित वातावरणाबरोबरच त्यांचे संगोपन करते. त्याशिवाय कायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे या मुलांना हक्काचे कुटुंब मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे वरदा मेहेंदळे यांनी सांगितले. चिमुकल्या रामला हक्काचे आईबाबा मिळाल्याने त्याचे भविष्य आता उज्ज्वल होईल, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

आणि त्याला प्रेमाने कुशीत घेतले

आज अलिबागच्या शिशुगृहात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशीचा मुहूर्त साधत दत्तक विधानसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून तेथील महिला व अन्य कर्मचारी तयारी करीत होते. अखेर तो क्षण जवळ आला. रामला महिलांनी ओवाळले. त्यानंतर माल्टा येथील दाम्पत्याने त्याला प्रेमाने कुशीत घेतले. त्याला आईबाबा मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. यावेळी वात्सल्य ट्रस्टच्या संस्थापिका गीता वैशंपायन, उपप्रकल्पप्रमुख वरदा मेहेंदळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.