
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपण आलो आहोत. पाऊस बरा झाला तरी पावसाळ्यानंतरचा हा महिना कमालीच्या उकाडय़ाचा आणि ‘हीट’ निर्माण करणारा. बऱ्याचदा दिवाळी ऑक्टोबरात असते. अशावेळी आमच्या शाळेची सुट्टीही ऑक्टोबरातच यायची. त्या वेळी सारी दुपार हुंडण्यात घालवताना घरून चार शब्द ऐकावे लागायचे. त्यातलं एक वाक्य कायमचं असायचं ‘ऑक्टोबर हीट’ आहे, जरा सावलीतले खेळ खेळा. अर्थात त्या वेळी वडाच्या झाडावरच सूरपारंब्या खेळण्याएवढी आणि चिंचा पाडून झाल्या की, त्याच झाडाखाली बसून त्या चाखण्याइतपत झाडी मुंबईतही होती. शहरापासून थोडं लांब गेलं की, बदलापूरही निसर्गरम्य असायचं. आता नाशिक-पुण्यापर्यंतच्या सगळ्याच वाटांवर दुतर्फा वनश्री नव्हे, तर काँक्रीटची जंगलं दिसतात. मे महिन्यात सांगलीला आजोळी गेलं तर तिथंपासून हरिपूरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूच्या विशाल वृक्षराजीने भरलेला असायचा.
ते वैभव आपल्याकडेच नव्हे, तर जगातल्या सर्वच गर्दीच्या वस्त्यांमधून जात चाललंय. ठायी ठायी काँक्रीट आणि काचेच्या उंचच उंच गगनस्पर्शी इमारती उभ्या राहताहेत. त्यातून त्यांच्या एसी यंत्रणा चालण्यातून निर्माण होणारी ‘हीट’सुद्धा वातावरणातच मिसळतेय. आता तर ‘एआय’ची यंत्रणा किती ऊर्जा खाईल, किती सोडेल याचे हिशेब मांडले जातायत. त्यातून किती उष्णता निर्माण होईल आणि त्याचे विपरीत परिणाम काय असतील याचीही चर्चा त्याच्या उपयुक्ततेबरोबरच सुरू झाली आहे.
याशिवाय यावर्षीप्रमाणे पावसाने ओढ दिली असेल. अनेक कारणांनी वर्षानुवर्षे भूजलाचे साठे संपवत आणलेले असतील तर धरणीसुद्धा अंतर्बाह्य तापणारच. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा असा ‘एल निनो’चा प्रकोप आहेच.
आपला देश तर समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधातला.दक्षिणी राज्यांमध्ये विषुववृत्तीय गरम हवामान, तर आपल्याकडे थोडं कमी, पण पुन्हा उत्तर महाराष्ट्रात नागपूरसारख्या ठिकाणी विषम हवामानाचे चटके बसतातच. पूर्वीसारखी थंडी आता पडत नाही’ असं तिथलेही स्नेही सांगतात. एकेकाळी म्हणजे अगदी 1960 च्या दशकापर्यंत पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ‘हीट’चा थोडा काळ सोडला तर नोव्हेंबरपासून पहाटे स्वच्छ धुक्याचा पडदा दिसायचा. आता कायमच ‘धुरक्या’ची चादर असते.
मग यंदाचा ऑक्टोबर जगाला किती ‘हीट’कारक ठरणार आहे याचा लेखाजोगा मांडायचा तर पृष्ठभागाचं तापमान ‘एल निनो’मुळे तापलेला पॅसिफिक महासागर गरम वारे निर्माण करतच राहणार. त्यामुळे सूर्य 23 सप्टेंबरनंतर दक्षिण गोलार्धावर गेला की, उत्तर गोलार्धातील साडेतेवीस अक्षांशाच्या वरच्या भागात सुखद थंडीची चाहूल लागायची. आपल्याकडे उज्जैनपासून वरचा भाग थंड व्हायला लागायचा. युरोपात तर आगामी हिमवृष्टीची चाहूल लागायची.
हे सारं निसर्गाच्या नित्यक्रमाप्रमाणे अगदी गेल्या वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत घडत होतं, परंतु या वेळच्या ऑक्टोबर ‘हीट’चा तडका युरोपला चांगलाच बसतोय. तापमानात 8 ते 12 अंशाची वाढ होऊन ते 35 अंशापर्यंत पारा चढला की, युरोपीय लोकांची लाहीलाही होते. आपल्याकडे 35, 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सोसण्याची पारंपरिक सवय आहे. अर्थात त्याचा त्रास होतोच, पण आपल्या उन्हाळी देशासाठी ती गोष्ट नवी नाही, परंतु बहुतेक वर्षभर कुडकुडणाऱ्या युरोपला 35-40 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे कठोर शिक्षा ठरते. गेल्यावर्षी युरोप-अमेरिका-कॅनडामध्ये काही ठिकाणी निर्माण झालेल्या ‘हीट डोम’मुळे शहरातल्या रस्त्यांवरच्या कारंजांच्या पाण्यातही माणसं डुंबतायत अशी दृश्ये दिसली होती. यंदा परिस्थिती वेगळी नाही.
ऑक्टोबर ‘हीट’कारक होण्याचं मुख्य कारण असतं ते कडक उन्हाबरोबरच हवेतली आर्द्रता (ह्युमिडिटी) कमालीची वाढण्याचं. या स्थितीत हवामानाचा पारा 30 अंश तापमान दाखवत असला तरी प्रत्यक्ष अनुभवाला येणारा परिणाम ह्युमिडिटीमुळे 35 अंशासारखा असतो. मग मुळात तापमान 35 अंशाच्या वर गेलं तर उष्णतेचा कहरच.
उपायही लगेच सुचवले जातात. नैसर्गिक थंडावा देणारी नारळपाण्यासारखी पेय प्या. जास्त द्रवरूप आहार घ्या. पचनाला जड, अतितिखट पदार्थ टाळा. काॅफी-दारूचं सेवन मर्यादित ठेवा वगैरे. याशिवाय मलमलीसारख्या तलम कापडाचे कपडे वापरणे, मंद रंगाची वेशभूषा असणे, शक्यतो सुती कपडेच वापरणे असेही सल्ले दिले जातात. मनगटावरच्या ‘पल्स’ (नाडी) पॉइन्टवर बर्फ ठेवणे असाही उपाय सुचवला जातो. याशिवाय सनस्क्रीन क्रीम वगैरे आहेतच. डोक्यावर ‘हॅट’सारखी डोक्याबरोबरच कानांचंही उन्हापासून रक्षण करणारी टोपी असावी याची चर्चा युरोपात होतेय.
आपल्याकडे परंपरेनेच टोपी पिंवा मुंडासं बांधताना मान आणि कान झाकले जातील व डोक्यावर कांदा ठेवण्याची पद्धत होती. शारीरिक श्रम करावेच लागतात अशांनी अधूनमधून विश्रांती घेणंही गरजेच. व्यायामाची वेळही शक्यतो संध्याकाळनंतर ठेवावी असे सांगितले जाते, पण या साऱया गोष्टी सुबत्तेभोवती घोटाळण्याऱया. जिथे ‘पिण्याला थेंबही नाही’ अशा दुष्काळात ‘यंव करा नि त्यंव करा’चे पांडित्य काय कामाचं? आल्या परिस्थितीला धीराने तोंड देत उन्हाचा तडाखा ओसरण्याची वाट बघायची दुसरं काय! कधीकाळी माणसाला ‘जाग’ आली तरच ऋतुचक्र हितकारक होईल.
विनायक





























































