
नवी मुंबईत होणाऱ्या फॉर्म्युला वन रेसला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकर आणि क्रीडाप्रेमींमध्ये या रेसचे कुतूहल निर्माण झाले होते. अखेर या रेसचे वेळापत्रक इंडियन रेसिंग फेस्टिव्हलने जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या ५ आणि ६ डिसेंबर रोजी रात्री ही रेस नवी मुंबईतील पाम बिच मार्गावर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये पार पडलेल्या रेसनंतर दोन वर्षांनी ही रेस नवी मुंबईत होत आहे.
इंडियन रेसिंग फेस्टिव्हलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या फॉर्म्युला वनची सुरुवात चेन्नईमधून होणार आहे. चेन्नईतील एमआयसीच्या स्ट्रीट सर्किटवर रेसची पहिली आणि तिसरी फेरी येत्या २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी आणि चौथी फेरी ग्रेटर नोएडाच्या बीआयसी स्ट्रीटवर पार पडणार आहे. पाचवी आणि चौथी फेरीही नोएडामध्येच होणार आहे. सहावी आणि चौथी फेरी नवी मुंबईत येत्या ५ आणि ६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी पामबीच मार्गासह नेरुळ येथील नवी मुंबई ज्वेल्सभोवती ३.९६ किलोमीटर लांबीचे स्ट्रीट सर्किट तयार करण्यात आले आहे. या फॉर्म्युला वन रेसमुळे नवी मुंबई शहर पुन्हा जागतिक पातळीवर झळकणार आहे.
तयारी पूर्ण झाली
जागतिक पातळीवर शहराची वेगळी ओळख निर्माण करणारा हा उपक्रम राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली रावबला जात आहे. फॉर्म्युला वन रेसची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही रेस नवी मुंबईकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी व्यक्त केली आहे. आरदवाड हे या उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत.


























































