दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशातील धोके आणि धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलेश कुलकर्णी 

[email protected]

उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यात भाजपच्या मार्गात यावेळी अनेक अडसर आहेत. दहा वर्षांची ऑण्टिइन्कम्बन्सी, मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचे ठाकूर राज, त्यामुळे भाजपची दुरावलेली पारंपरिक मतपेढी, दिल्ली व योगींमध्ये असलेला छत्तीसचा आकडा, भ्रष्टाचाराने गाठलेला कळस यामुळे उत्तर प्रदेशचा पेपर भाजपसाठी यावेळी किंचित कठीण आहे. तेथील सामाजिक संतुलन महत्त्वाचे आहे हे ओळखून भाजपने राज्यसभेत पेरणी केली आहे. उत्तर प्रदेशचे ‘धोके’ तर भाजपने वेळीच ओळखलेत, पण ‘धक्के’ तर अजून बसायचे बाकी आहेत.

 उत्तर प्रदेश जिंकावे, मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कट टू साईज’ करून, अशी दिल्लीची उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती आहे, तर ‘उत्तर प्रदेश गया तो दिल्ली गया’, असा मेसेज योगी दिल्लीला देत आहेत. भाजपमध्ये अशी अंतर्गत लाथाळी सुरू असतानाच ब्राह्मणांसह इतर जातींना सोबत घेऊन अखिलेश यादव मोट बांधताना दिसत आहेत. त्यामुळे जातीपातीची समीकरणे पुन्हा बसवता बसवता भाजपच्या नाकी नऊ येत आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली आपला छळवाद झाल्याची भावना झालेल्या ब्राह्मणांची समजूत काढण्यासाठी राज्यसभेसाठीच्या यादीत त्या समाजातील दोघांचा समावेश करण्यात आला. स्मृती इराणी, हरदीप पुरी, हरीश द्विवेदी ही मोठी नावे राज्यसभेवर असतील, अशा अटकळी मीडिया लावत होता. पण मीडियासह इच्छुक मंडळीही तोंडावर आपटली. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ग्लॅमर नाही, तर सामाजिक संतुलन महत्त्वाचे आहे, हे ओळखून भाजपने राज्यसभेत पेरणी केली आहे. मात्र हा ‘डोंगर पोखरून उंदीर काढण्या’चा प्रकार होण्याची शक्यता आहे. मीडियावाले स्मृती इराणींना पेंद्रीय मंत्री बनवून चुकले होते. अनेक प्रकारची पतंगबाजी सुरू होती. मात्र, सगळी हेवीवेट नावे बाजूला सारून भाजपने गुगल करावी लागतील, अशी नावे जाहीर करून सगळ्यांनाच धक्का दिला. मात्र ही नावे जाहीर करण्यामागेही आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे आहेत. छोटय़ा-मोठय़ा जात समूहांची मोट बांधून निवडणूक लढण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण यावेळी चालणार नाही. त्यातच राममंदिरातील दानपेटीवर भाजप व संघाच्या लोकांनी मारलेला डल्ला जनतेच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादीही भाजपपासून चार हात लांबच आहेत. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जातीयवादी राजकारणामुळे हिंदुत्वाच्या छत्राखाली एकटवलेला समाज पुन्हा विविध जातींमध्ये विखुरला गेला आहे. आता या समाजघटकांना पुन्हा एकछत्राखाली आणले तरच उत्तर प्रदेश भाजपला पुन्हा जिंकता येईल. त्यामुळेच रमाकांत ओझा, गोपीपृष्ण पांडे हे दोन ब्राह्मण, रामसिंह चौहान हे ठापूर, तर राज्यात मंत्री असलेले धर्मपाल सिंह या लोध तसेच श्रुती गंगवार, प्रकाश पाल या मायक्रो ओsबीसी, विद्यासागर सोनकर, प्रियंका रावत या दलित समाजातील नेत्यांना भाजपने संधी दिली आहे. लोध, पासी व राजभर हा समाज योगींच्या धोरणामुळे भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहे. त्याला चुचकारण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे. या यादीच्या निमित्ताने दिल्लीने योगींच्या मनमानीलाही कात्री लावली आहे. एकाही योगी समर्थकाचा यादीत समावेश नाही. भाजप मुख्यालयात कोणतेही कर्तृत्व नसताना केवळ राजनाथ सिंहांचे जवळचे नातेवाईक म्हणून वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अरुण सिंग यांनाही पक्षाने नारळ दिला आहे. भाजप फक्त ठापूरधार्जिणा नसून सर्वसमावेशक पक्ष असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या यादीतून करण्यात आला आहे. अर्थात, तो मतदारांच्या गळी कितपत उतरेल, शंकाच आहे.

 गोपीकृष्ण पांडे, मोदी अन् ‘गदर’

भाजपच्या उत्तर प्रदेशच्या राज्यसभा यादीतील सर्वाधिक धक्कादायक नाव म्हणजे गोपीपृष्ण पांडे. कोण हे गोपीपृष्ण? असा प्रश्न अनेकांना पडला. हे पांडेजी अनेक वर्षांपासून संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ‘कानपूरवाले पांडेजी’ विश्व हिंदू परिषदेचे एकेकाळचे महत्त्वाचे कार्यकर्ते राहिले आहेत. भाजपच्या किसान मोर्चातही ते सक्रिय होते. आता अचानक त्यांचे नाव यादीत आल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र असल्याची माहिती उघड झाली आहे. वीस-पंचवीस वर्षांपासून मोदींचा त्यांचा दोस्ताना आहे. उत्तर प्रदेश संदर्भातील फीडबॅक मोदी त्यांच्याकडून घेतात अशीही वदंता ऐकायला मिळते. पंचवीसेक वर्षांपूर्वी मोदी सत्तेत नसतानाची गोष्ट. याच पांडेजींनी त्यांना कानपूरमध्ये ‘गदर’ सिनेमा दाखविला होता. या सगळ्याची बक्षिसी राज्यसभेच्या रूपात मिळेल, याची कल्पनाही पांडेंनी केली नसेल. मात्र त्यांना हा लाभ झाला. हरीश द्विवेदी यांच्यासारख्या पुशल संघटकाला डावलून पांडेंना संधी दिल्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणे स्वाभाविक आहे. राज्यसभेचा पत्ता कट झालेले स्मृती इराणी व द्विवेदी आगामी लोकसभेत आपले नशीब आजमावतील, असेच दिसतेय. ‘गदर’ सिनेमात एक गाणे आहे…‘एक मोड आया…’ गोपीकृष्ण पांडे यांच्या जीवनात राज्यसभेच्या निमित्ताने असाच एक निर्णायक ‘मोड’ आला आहे.

 

जाहिरातबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात गाजावाजा करून त्यांचा ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्याचा भाजपने संकल्प केला. मात्र ‘मोदी मोदी’ करून आता भाजपवालेही पंटाळले असल्याने ‘एक दिया आशिर्वाद का’ जसा निस्तेज ठरला तसाही हा सेवा सप्ताहही पार निस्तेज ठरला. मोदीजींबद्दल भाजपाई मंडळी चार ओळींची जाहिरात देण्यासाठी राजी नसताना मोदींच्या कार्यकर्तृत्वाच्या जाहिराती देशभरात देणारे जे दोन नेते देशात आढळून आले ते घटक पक्षाचे. एकनाथ शिंदे व अशोक मित्तल हे ते दोन महाभाग! अशा जाहिराती दिल्याने का होईना, खूष होऊन मोदी आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतील, या भाबडय़ा आशेवर शिंदेंनी वारेमाप जाहिराती दिल्या तर आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये ईडीच्या भीतीने उडी मारलेल्या अशोक मित्तल यांनीही उत्तर भारतात पाने भरून जाहिराती दिल्या आणि त्यांच्या मोदीप्रेमाची साक्ष जगाला दिली. वास्तविक, मित्तलांचे मोदीप्रेम उफाळून येण्यामागे त्यांच्या लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सिटीच्या मागे पंजाबच्या आप सरकारने लावलेले शुक्लकाष्ठ आहे. एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याच्या अफवेमुळे या विद्यापीठात दंगल झाली होती. त्यामुळे दहा दिवस विद्यापीठ बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे मित्तल यांना आता मोदींचा सहारा गरजेचाच आहे. गमतीचा भाग म्हणजे आपमध्ये असताना याच मित्तल यांनी आपले फिरोजशाह रोडवरील शासकीय निवासस्थान हे अरविंद केजरीवाल बेघर झाल्यानंतर त्यांना राहायला दिले होते. आता तेच मित्तल महाशय ‘मोदी चालिसा’ची पानेच्या पाने भरून जाहिराती देत आहेत.