पासपोर्टला एल्युमिनियम फॉइलच कव्हर लावण्यामागचं नेमकं कारण काय, का होतोय हा ट्रेंड व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणी पासपोर्ट कव्हरमध्ये ठेवतं, तर कुणी त्याला चक्क स्वयंपाकघरातल्या एल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळतंय! परदेश प्रवास करणाऱ्या काही लोकांमध्ये सध्या हा अजब ट्रेंड चर्चेत आहे. पासपोर्टमधील खासगी माहितीची चोरी होऊ नये, यासाठी हा जुगाड केला जात असल्याचा दावा केला जातोय. पण प्रश्न असा आहे की, स्वयंपाकघरात पोळ्या किंवा अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरली जाणारी फॉइल पासपोर्टची सुरक्षा करू शकते का? की हा केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आणखी एक भन्नाट प्रयोग आहे?

आज अनेक देशांच्या पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असते. बायोमेट्रिक पासपोर्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पासपोर्टमध्ये धारकाची काही वैयक्तिक माहिती आणि डिजिटल छायाचित्र साठवलेले असते. विमानतळावरील इमिग्रेशन तपासणीदरम्यान या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

मात्र, याच चिपमधील माहिती कोणी परस्पर वाचू नये, अशी काही प्रवाशांना चिंता वाटते. एखाद्या व्यक्तीने विशेष वायरलेस रीडरच्या मदतीने जवळून पासपोर्टमधील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर? याच भीतीतून काही जणांनी पासपोर्टला एल्युमिनियम फॉइलचं सुरक्षा कवच देण्याचा मार्ग शोधला आहे. सोशल मीडियावरही या युक्तीची चर्चा रंगताना दिसतेय.

एल्युमिनियम हा धातू रेडिओ लहरी आणि काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलना अडथळा निर्माण करू शकतो. एखाद्या उपकरणाभोवती योग्य प्रकारे धातूचे आवरण तयार केल्यास बाहेरील सिग्नलचा त्याच्याशी संपर्क होणे कठीण होऊ शकते. या तत्त्वाला ‘फॅराडे केज’ असं म्हटलं जातं.

पासपोर्टच्या चिपला अतिरिक्त संरक्षण द्यायचं असेल, तर एल्युमिनियम फॉइलच्या जुगाडाऐवजी खास RFID-ब्लॉकिंग स्लीव्ह वापरण्याचा पर्याय आहे. हे कव्हर वायरलेस सिग्नल रोखण्यासाठी तयार केलेलं असतं. मात्र, त्याची गुणवत्ता योग्य आहे का, हे तपासणं गरजेचं आहे.

याशिवाय पासपोर्ट सुरक्षित ठिकाणी ठेवणं, त्याचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना न पाठवणं आणि प्रवासादरम्यान पासपोर्ट बेवारस न सोडणं या साध्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.