
महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून केंद्राचे पथकही पाहणीसाठी आले आहे. मात्र शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. नागभीड तालक्यातील मिंथूर येथे पावसाअभावी धान पिकाचे नुकसान झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने गावातील तलावात उडी घेतली आहे.
मुखरू लक्ष्मण दडमल (वय – 60) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे दीड एकर धानाची शेती होती. पावसाअभावी शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज गावातील तलावात उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी तलाव परिसरात गर्दी केली. तलावात उडी घेतलेल्या शेतकऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत असताना, हातातोंडाशी असलेल्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडत असल्याचे चित्र आहे.




























































