
राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीमध्ये कालवे पकडण्यासाठी गेलेली एकाच कुटुंबातील चार भावंड पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये एका मुलासह तीन मुलींचा समावेश असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका मुलीचा शोध अद्याप सुरू आहे.
नाणार इंगळवाडी येथील जुनेद भाटकर यांची पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये मुळे व कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत असताना, दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पात्रातील एका खोल खड्ड्याचा अंदाज मुलांना आला नाही. एकापाठोपाठ एक अशी पाचही लहान मुले खाडीच्या खोल पाण्यात ओढली गेली. मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामध्ये एका लहान मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले.
मात्र, मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे,), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे), बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे ), माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे) ही चारही भावंडे पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांसाह प्रशासन व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या साहाय्याने तातडीने बचाव व शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यामध्ये मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे, तर १५ वर्षीय माहिरा भाटकर हिचा शोध अद्याप खाडीपात्रात युद्धपातळीवर सुरू आहे.



























































