हे भाजप विरुद्ध भारत चित्र; ही दादागिरी, हुकुमशाही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही! आदित्य ठाकरे गरजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दादर येथे आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आंदोलकांच्या सुटकेसाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे व मनसे नेते अमित ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या केला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना सोडले. या प्रकारानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले.

”आम्ही या पोलिसांसाठी भांडत असतो, त्यांच्या घरांसाठी लढत असतो. आम्ही कायम पोलिसांसाठी लढत आलोय व मुंबई पोलिसांचं देखील आम्हाला कायम सहकार्य राहिलंय. पण काल ऑगस्ट क्रांती मैदान तसंच आज शिवाजी पार्कातील आंदोलनात पोलिसांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. आज जे काही आम्ही पाहिलं ते मुंबई पोलिसांचं एक वेगळं रूप होतं. तरुण, तरुणी, विद्यार्थी जे आंदोलनाला आले होते त्यांची धरपकड सुरू होती. आज आम्ही वेळेत पोहोचलो नसतो तर या पोलिसांनी आंदोलकांना सोडलं नसतं. आमच्या देखील शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेत होते. श्रद्धा जाधव, मांजरेकर ताईंना देखील दोघांनी उचललं. एकीची तर साडी फाटली आहे. ही एवढी दादागिरी हुकुमशाही या महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही लढत राहू पण शांत बसणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

”आता आम्ही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बसलो होतो, जो पर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत ठिय्या देणार असा इशारा दिला होता. त्यामुळे सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली. पण हे फक्त शिवाजी पार्क येथील पोलीस ठाण्यातलं होतं. कालपासून ज्यांना ताब्यात घेतलं जातंय त्यांना अटक केल्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेले जातेय. कुणाला घाटकोपरला नेलं जातंय, कुणाला वरळीला नेलं जातंय. काल वरुणला डोंगरी पोलीस ठाण्यात नेलेलं. आज तुषार गांधींना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेलं जातंय. हे कशासाठी चाललं आहे. ही दडपशाही कुणावर करताय तुम्ही? या देशातील नागरिकांवर करताय? जे आम्ही सातत्याने बोलतोय की भाजप विरुद्ध भारत हे चित्र आता रस्त्यावर दिसू लागलं आहे. दिल्लीत पत्रकारांना देखील सोडलं नाही. आज आम्ही पाहतोय की दिल्लीत पत्रकारांना देखील सोडलं नाही. हे हाल आम्ही मुंबईमध्ये कदापी होऊ देणार नाहीट”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.