भाजप इतका घाबरला आहे की, शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले जात आहे; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. तसेच, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. एसआयआर विरोधात छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांची धरपकड करत असल्याने, आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.

ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “भाजप इतका घाबरला आहे की, मुंबईतही सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात शांततेत, पण निर्भयपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले जात आहे.”

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुंबई पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. “मुंबई पोलिसांना आता अगदी वरिष्ठ स्तरावरून आदेश दिले जात असल्याचे दिसते. पोलिसांच्या फौजेच्या बॅरिकेड्समागे हे वरिष्ठ नेतृत्व स्वतःला सुरक्षित ठेवत आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी, “तुम्हाला कुठे घेऊन जात आहेत, हे आम्हाला कळवा. आम्ही येत आहोत. तसेच, आम्ही तुम्हाला कायदेशीर मदतही करू,” असे म्हटले आहे.