
दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केंद्र सरकार आणि प्रशासनावर टीका केली. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि महिलांशी गैरवर्तन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हिटलरकडून धडे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान राजकीय कार्यकर्ते आणि तरुणांवर बळाचा वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, “या लोकांनी हिटलरकडून धडे घेतले आहे. आपल्या मुलींशी गैरवर्तन करणारे लोक उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. ते गाझियाबादचे असल्याची चर्चा आहे. हिटलरचे सैनिकही अशाच प्रकारे इतर राजकीय कार्यकर्त्यांना मारहाण करत असत.”
ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी
दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली. सरकारने अटक केलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित सोडले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी आयोगावर टीका केली. “निवडणूक आयोग चोर आहे, हे कोणाला माहीत नाही? निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतो, हेही कोणाला माहीत नाही? भाजपने आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच आपले कार्यालय सुरू करावे,” असे विधानही अखिलेश यादव यांनी केले.
उत्तर प्रदेशातील मतदारांची नावे हटवल्याचा आरोप
“उत्तर प्रदेशात फॉर्म-7 च्या कथित गैरवापराच्या प्रकरणात कोणावर कारवाई करण्यात आली का? पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे हे निवडणूक आयोगाचे प्रमुख काम आहे. मात्र, येथे मतदारांची नावे हटवली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.























































