
हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढवणारी तिसरी अँटी-सबमरीन युद्धनौका ‘मांगरोल’ सोमवारी मुंबईत नौदलाच्या ताफ्यात अधिकृतरीत्या दाखल झाली. या युद्धनौकेच्या समावेशामुळे हिंदुस्थानच्या नौदलाची पाणबुडीविरोधी क्षमता वाढली आहे. ही युद्धनौका अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत समुद्राला उधाण आलेले असतानाही शत्रूच्या पाणबुड्या शोधून काढू शकते.
‘मांगरोल’ युद्धनौकेची बांधणी कोची येथील ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ने (CSL) केली आहे. ही युद्धनौका सागरी गस्ती विमाने (Maritime Patrol Aircraft), हेलिकॉप्टर्स आणि इतर युद्धनौकांच्या समन्वयाने समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांचा अचूक शोध घेऊन त्यांना उद्ध्वस्त करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
‘मांगरोल’च्या आगमनामुळे देशातील प्रमुख बंदरे, सागरी तळ आणि किनारपट्टी भागांचे रक्षण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच नौदलाच्या मुख्य ताफ्याला सर्वंकष सागरी मोहिमांदरम्यान यामुळे महत्त्वाची सुरक्षा आणि पाठबळ मिळणार आहे.
























































