
सहजसुंदर अभिनय, नृत्य निपुणता आणि बावनकशी अदाकारीने मराठी लोककला, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधु कांबीकर (73) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. येरवडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे लावणीची सखी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
2016 मध्ये लावणीचा कार्यक्रम सादर करत असतानाच त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘शापित’मधून मिळाली ओळख
राजदत्त दिग्दर्शित ‘शापित’ चित्रपटामुळे त्यांना ओळख दिली. त्यानंतर ‘राघू मैना’, ‘हेच माझं माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’, ‘झपाटलेला’, ‘झपाटलेला 2’, ‘स्त्राr जन्मा ही तुझी कहाणी’, ‘मला घेऊन चला’, ‘येऊ का घरात’, ‘बिनकामाचा नवरा’ अशा अनेक चित्रपटांतून त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या. ‘एक होता विदूषक’मधील त्यांची भूमिका, ‘झपाटलेला’मधील लक्ष्याच्या आईची व्यक्तिरेखा आणि ‘डेबू’ चित्रपटातील संत गाडगे महाराज यांच्या आईची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. गंभीर, भावनाप्रधान आणि विनोदी भूमिकांमध्येही त्यांनी आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले.
हिंदी, गुजराती चित्रपटांतही छाप
मधु कांबीकर यांनी ‘हम दोनों’, ‘सातवाँ आसमान’, ‘अपनापन’, ‘यशवंत’ आणि ‘शोला और शबनम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. ‘साद’ या गुजराती चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचेही कौतुक झाले. मराठी नाटकांबरोबरच ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’ यांसारख्या लोकनाटय़ांतही त्यांनी काम केले. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
लोककलेशी नाते जपले!
मधु कांबीकर यांनी लोककलेशी असलेले नाते सदैव जपले. लावणीवरील त्यांचे प्रेम हे केवळ सादरीकरणापुरते मर्यादित नव्हते. लावणीचा इतिहास, परंपरा आणि तिचे अस्सल स्वरूप पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘मधुप्रीतम’ या संस्थेच्या माध्यमातून ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सादर करून त्यांनी पारंपरिक लावणी जपण्यासाठी प्रयत्न केले.

























































