पंचगंगा, समर्थची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवांश मगरच्या तुफानी चढाया आणि वेदांत देसाईच्या जोरदार पकडींच्या जोरावर शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेतील कुमार गटात पंचगंगा सेवा मंडळाने अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी गोल्फादेवी सेवा मंडळाचा 48-47 असा अवघ्या एका गुणांच्या फरकाने पराभव करीत विजयी सलामी दिली. तसेच समर्थ स्पोर्टस्ने संस्कृती प्रतिष्ठानचा पराभव केला. मुंबईच्या कबड्डी हंगामाची सुरुवात करणाऱ्या शिवनेरी कबड्डीत विशेष व्यावसायिक, प्रथम श्रेणी व्यावसायिक, कुमार आणि महिला असे चार गट खेळणार आहेत.

दुसऱ्या लढतीत समर्थ स्पोर्टस्ने संस्कृती प्रतिष्ठानचा 15 गुणांनी पराभव केला. गोकुळ क्रीडा मंडळाने वीर संताजी क्रीडा मंडळावर तीन गुणांनी मात केली. अन्य सामन्यांमध्ये बंडय़ा मारुती संघाने नवनाथ क्रीडा मंडळाचा 47-37 असा दहा गुणांनी पराभव केला. आकांक्षा क्रीडा मंडळाने एफडर्स युनायटेड संघावर 33-23 अशी दहा गुणांनी मात केली.

मुंबईच्या माजी महापौर नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. या वेळी विधानसभाप्रमुख सुरेश कदम, नगरसेविका उर्मिला पांचाळ, सुनीता आयरे, हरदीपसिंग लाली, प्रशांत घाडीगावकर, मंडळाचे नितीन पेडणेकर, अध्यक्ष सुयोगी नाईक, कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, देविदास कदम, सचिन मांजरेकर, किरण मोरजकर, संजय मांजरेकर, शाखाप्रमुख समीर दळवी आणि सुरेश काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.