जनता कोणाच्याही दडपशाहीला घाबरणार नाही, राहुल गांधी यांची केंद्र सरकार आणि RSS वर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्च्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनात सहभागी झालेले नागरिक, पक्षकर्ते आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत. हा मोर्चा म्हणजे सरकारच्या दडपशाहीला दिलेले सडेतोड उत्तर असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) दादागिरी करत असल्याचा आरोप केला आहे.

निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या प्रक्रियेतील गैरप्रकारांचा निषेध करण्यासाठी हजारो राजकीय कार्यकर्ते आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे कूच केली होती. या मोर्च्याचा समारोप विरोधी पक्षांच्या ११ प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केला. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने मतदार यादी पुनरिक्षणाचे निर्णय घेतले आहेत, त्याला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी X वर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, “आजच्या आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या आणि दुपारी ३ वाजता आपापल्या परीने पाठिंबा दर्शवलेल्या लाखो लोकांचे मी आभार मानतो. देशातील जनता कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही, हे सरकारला दाखवून देणे आज अत्यंत गरजेचे होते. तुम्ही आम्हाला मारू शकत नाही, धमकावू शकत नाही किंवा घाबरवू शकत नाही. आम्ही ही दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही.”

यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “परवा लहान मुलांना मारहाण करणारे संघाचे भ्याड लोक आज कुठे गेले? जेव्हा देशाची जनता एकत्र उभी राहते, तेव्हा हे लोक बाहेर का येत नाहीत?” पंतप्रधान आणि सरकार केवळ सत्तेचा वापर करून लढत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढे आलेल्या सर्व नागरी समाज संघटनांचे त्यांनी विशेष आभार मानले.