
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) संशयास्पद इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसचा (IED) शक्तिशाली स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, मृत आणि जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.
टाइम्स आॅफ इंडियाने असे वृत्त दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील सतवाल-नाकी परिसरात, ‘झिरो लाईन’च्या जवळ हा स्फोट झाला. नियंत्रण रेषेच्या पाकिस्तानी बाजूला लोकांचा एक गट जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाच्या वेळी उपस्थित असलेला गट नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणारे संशयित दहशतवादी होते की त्या परिसरात गस्त घालणारे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. स्फोटाचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.
स्फोटानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नियंत्रण रेषेवरील देखरेख वाढवण्यात आली असून, संभाव्य सुरक्षा त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत तपशील आणि जीवितहानीची निश्चित माहिती समोर येणे बाकी आहे. परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.


























































