
देशद्रोही, गद्दार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन पेटले आहे. यातच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. याच आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही आज मूक मोर्चा आयोजित केला होता, यासाठी की, देश जेव्हा शांत होतो आणि एकाच व्यक्तीची मन की बात ऐकावी लागते, तेव्हा कशी शांतता होते आणि लोक किती गुदमरतात हे आपल्याला बघायला मिळतं. आज आपण पाहतोय काल-परवाची जी गळचेपी झाली होती, ती आज झालेली नाही. आम्ही खूप वेळा मुंबई पोलिसांचं कौतुक करत असतो, पण काल आणि परवा त्यांचं जे भयानक रूप दिसलं, तेव्हा असं वाटायला लागलं होतं की, दिल्लीकडून आदेश येत आहेत की काय. आज परत एकदा आम्ही सांगितलं आहे की, दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत आम्हाला निदर्शनं करू द्या. आम्ही आमच्या देशात आमच्याच अधिकारांसाठी लढत आहोत, मतचोरीच्या विरोधात लढत आहोत. ही आंदोलने संपूर्ण देशात सगळीकडे सुरू राहणार आहेत.”
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “जे निर्लज्ज आहेत, ते राजीनामा देणारच नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी पटीने फौज वाढवून ज्ञानेश कुमार यांना वाचवलं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवलं नाही, मात्र ज्ञानेश कुमार यांना वाचवलं जात आहे. याचं कारण म्हणजे, हे सरकार जे बनलं आहे, ते मतचोरी आणि निवडणूक चोरीने बनलं आहे.”
सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ज्या क्षणी तुम्हाला एवढं पोलीस बळ लावावं लागतं, वॉटर कॅननचा वापर करावा लागतो, लाठीमार करावा लागतो; मग तो राहुल गांधी असो, नेहा बोरा, अभिजित दीपके किंवा सौरव दास असो, या सगळ्यांना अडवायला तुम्हाला इतका पोलीस फौजफाटा लागतो. या तरुण मुलांना उचलावं लागतं, त्या क्षणीच आंदोलन यशस्वी झालं आहे, हे समजतं.”
ते म्हणाले की, “दिल्लीत तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. सगळे देशभक्त रस्त्यावर उतरले आहेत आणि न्याय मागत आहेत. ते मतचोरीच्या विरोधात लढत आहेत. देशद्रोही, गद्दार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.”

























































