राहुल गांधी यांनी मानले आंदोलनकर्त्यांचे आभार; म्हणाले, आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाच्या दिशेने काढलेल्या मोर्चानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि नागरी संघटनांचे आभार मानले. ‘या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या करोडो लोकांचे मनापासून आभार,’ असे म्हणत त्यांनी आंदोलनातील एकजुटीचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये दुपारी ३ वाजता विविध माध्यमांतून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचे विशेष आभार मानले. इंडिया आघाडीचे नेते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आघाडीतील इतर कार्यकर्त्यांनी एक संघ म्हणून काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. हिंदुस्थानातील जनता कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना घाबरणार नाही, हा संदेश सरकारपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. मारहाण किंवा धमक्यांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, तरी आम्ही घाबरणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. दोन दिवसांपूर्वी तरुण सहकाऱ्यांना मारहाण करणारे लोक आज कुठे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सत्तेच्या आणि ताकदीच्या जोरावर लढण्याऐवजी समोर येऊन उभे राहण्याचे आव्हान त्यांनी दिले.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, हे वेगवेगळे विरोध प्रदर्शन नसून संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सुरू असलेले एकच आंदोलन आहे. या लढ्यात सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही,’ असा निर्धार व्यक्त करत त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश दिला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरी संस्था आणि सामाजिक संघटनांचे राहुल गांधी यांनी विशेष आभार मानले. भारताची विचारधारा, संविधानाची मूल्ये आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.