पुण्याचे दुहेरी जेतेपद हुकले; कुमारी गटात बाजी, पण कुमार गटात हार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतवर्षी घरच्याच मैदानावर पुण्याच्या मुलींना कुमारी गटात जेतेपदाच्या लढतीत पालघरविरुद्ध हार सहन करावी लागली होती. मात्र त्यांनी त्या पराभवाचा हिशेब चुकता करताना पालघरला त्यांच्याच मैदानावर हरवले. पुण्याने 39-29 अशा फरकाने पालघरला नमवले. मात्र कुमार गटात परभणीच्या वेगवान खेळासमोर त्याचा निभाव लागला नाही आणि त्यांचे 53 व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत दुहेरी जेतेपदाचे स्वप्न 36-23 असे भंग पावले.

वसई-विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ती पुण्याच्या संघांनी. उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या या संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीही गाठली. त्यांनी कुमार गटात ठाण्याचे जेतेपद राखण्याचे स्वप्न धुळीस मिळवताना 32-24 असा विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात परभणीने अहिल्यानगरचे आव्हान 31-27 असे संपवले. कुमारी गटात पुण्याने मुंबई उपनगरचा 45-20 असा धुव्वा उडवला, तर पालघर आणि सांगली यांच्यातील थरारक सामना 48-47 असा निकाली लागला.

अंतिम सामन्यात पालघरकडून जेतेपद राखण्याची अपेक्षा होती, त्यांनी खेळही जोरदार केला. मात्र पुण्याच्या नियोजनबद्ध खेळापुढे पालघरच्या मुली कमी पडल्या. मध्यंतराला दोघांमधील खेळ अत्यंत चुरशीचा रंगला होता. मात्र उत्तरार्धात पुण्याने जोरदार आघाडी घेत आपले गतवर्षी हुकलेले जेतेपद पालघरकडून 39-29 असे हिसकावून घेतले. कुमार गटातही परभणीला पुण्याचे खेळाडू चांगलेच भिडले, पण निर्णायक क्षणी परभणीच्या खेळाडूंच्या कल्पक चढायांनी पुण्याला मागे टाकत बाजी मारली.