
आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, एकाच व्यक्तीची ‘मन की बात’ ऐकायला लागते तेव्हा कशी शांतता निर्माण होते आणि किती गुदमरायला होते तशी परिस्थिती आज आहे. मुंबई पोलिसांचे कौतुक आम्ही करत होतो, पण काल आणि परवाचा भयानक अनुभव पाहता दिल्लीवरून आदेश येताहेत की काय असे वाटायला लागलेय. काल-परवाची गळचेपी आज झालेली नाही. आमच्या देशात आमच्याच अधिकारासाठी व्होट चोरीविरोधात आम्ही लढत आहोत. ही आंदोलने देशभरात सुरूच राहणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही मागे हटणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
इतकी आंदोलने होऊनही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही, असे माध्यमांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर, धर्मेंद्र प्रधानांना वाचवले गेले नव्हते, पण आता दिल्लीत कितीतरी पटीने फौज वाढवून ज्ञानेश कुमारना वाचवले जातेय, कारण भाजपचे सरकारच व्होटचोरी आणि निवडणूक चोरी करून सत्तेवर आले आहे, असे उत्तर त्यांनी दिले. आम्ही आमच्याच देशात हक्कासाठी लढत आहोत. इतके पोलीस बळ लावावे लागते, वॉटर कॅनन लावावे लागतात, लाठीमार करावा लागतो, राहुल गांधी, नेहा बोरा, अभिजित दीपके, सौरभ दास यांना अडवायला आणि तरुण-तरुणींना उचलायला मोठय़ा प्रमाणात पोलीस उतरतात म्हणजे हे आंदोलन यशस्वी झाले आहे, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक नागरिकाला कळलेय की, त्याचे मत चोरीला गेले आहे आणि म्हणूनच देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. निवडणूक आयोगात आजही तीनही आयुक्त एकत्र बसत नाहीत. केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. देशभक्तीसाठी आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर पर्वा नाही. हिंमत असेल तर आम्हाला उचलून घेऊन जा, असे आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेना भवनातही घुसण्याचा काल प्रयत्न केला गेला. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार उत्तर दिले. पुन्हा तसा प्रयत्न झाल्यास तसेच उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. होते. ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धचे पुरावे राष्ट्रपतींना देणार, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांचे दुर्मिळ झालेले अधिकार आंदोलनात शोधतोय – तेजस ठाकरे
तेजस ठाकरे यांची उपस्थिती ही या आंदोलनात लक्षवेधी ठरली. तुम्ही प्रथमच अशा प्रकारे रस्त्यावरच्या आंदोलनात सहभागी झाला आहात, असे नमूद करत प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती शोधणाऱ्या तेजस ठाकरे यांना या आंदोलनात काय दुर्मिळ सापडले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, भाजपच्या राजवटीत देशातील नागरिकांचे अधिकारच दुर्मिळ झालेत. ते शोधायला मी या आंदोलनात उतरलोय आणि शोधल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे मार्मिक उत्तर तेजस ठाकरे यांनी दिले.
बॅलेट पेपरच्या बाजूने मतांचा पाऊस, ईव्हीएमला मोजून चार मते
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि संविधान रक्षणासाठी मनसेने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ाजवळ स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेत सहभागी होऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे, उर्वशी ठाकरे यांनीही स्वाक्षऱ्या केल्या. ईव्हीएम मशीन हवी की बॅलेट पेपर यावर यावेळी मतदान घेतले गेले. बॅलेट पेपरच्या पेटीत यावेळी लोकांनी मोठय़ा प्रमाणात मते टाकली. ईव्हीएम मशीनच्या मतपेटीत मोजून चार मते पडली. स्वाक्षऱ्या आणि झालेले मतदान याची माहिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवणार असल्याचे यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितले.
कितीही कलमे लावा, छातीवर लावून फिरू – अमित ठाकरे
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याने काय होणार असा प्रश्न यावेळी माध्यमांनी विचारला असता, राजीनाम्यामुळे भीती येते आणि इतर अधिकारी भ्रष्टाचार करण्यास धजावत नाहीत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे म्हणाले. रविवारच्या आंदोलनाबद्दल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांच्या मागे उभे राहिलो म्हणूनच आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कलमे लावली ती आम्ही छातीवर लावून अभिमानाने मिरवू, असे यावेळी अमित ठाकरे म्हणाले.
कितीतरी पटीने फौज वाढवून केंद्रात बसलेलं सरकार ज्ञानेश कुमारला वाचवत आहे. त्याचे कारण एकच आहे, हे सरकारच व्होट चोरी आणि निवडणूक चोरीतून बनले आहे. – आदित्य ठाकरे

























































