MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश, विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तुकाराम मुंढे पेपरफुटी चौकशी समितीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गैरप्रकाराविरोधात आवाज उठविणाऱया परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठ यश आले आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर पेपरफुटीची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील गैरकारभार आणि पेपरफुटी प्रकरणी एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करत हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, कॉँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. रविवारी रात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी भीमनवार यांनी स्वतः ट्विट करुन आपण पेपरफुटीची चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनीही तत्वतः हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केलं.

चौकशी समितीत कोण?

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे. समितीच्या सचिवपदी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे असतील. माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा या समितीत समावेश आहे.