
होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 14 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असली तरी हिंदुस्थानी कर्णधार श्रेयस अय्यरला वेस्ट इंडीजबाबत अजूनही भीती वाटत आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचेही श्रेयसने म्हटले आहे.
वेस्ट इंडीजबाबत सावध
मालिकेत 2-1 ने आघाडीवर असूनही श्रेयसला माहिती आहे की, वेस्ट इंडीजसारख्या आक्रमक संघाविरुद्ध क्षणभराचा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो. दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने 250 धावांचे मोठे लक्ष्य पार करून हिंदुस्थानच्या संघाला धक्का दिला. हा धोका ओळखून अय्यरने संघाला गाफील न राहण्याचा इशारा दिला आहे. श्रेयस अय्यर म्हणाला, ‘वेस्ट इंडीज हा असा संघ आहे, ज्याला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू शकत नाही. विजय मिळवूनही आपण गाफीलपणाला बळी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण आक्रमक भूमिका कायम ठेवली पाहिजे, अन्यथा डाव कधीही उलटू शकतो.’
दवाची भीती आणि खेळपट्टय़ांचे आव्हान
हिंदुस्थानी कर्णधाराची सर्वात मोठी चिंता खेळपट्टी आणि दवाचा परिणाम ही आहे. 250 धावांचे आव्हानही वेस्ट इंडीजने लीलया पार केले. दवाचा सामन्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे श्रेयस चिंताग्रस्त झाला आहे. श्रेयसने आपली चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, दव सामन्यांच्या निकालांवर लक्षणीय परिणाम करत आहे. या परिस्थितीत दबावाखाली खेळाडू येतात आणि त्यांची कार्यपद्धती बदलते. काही वेळा खेळाडूंना नेमकं काय करावं हे सुचत नाही, त्यावेळी खेळाडू आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाहीत याची खात्री करणे हे मोठे आव्हान असते.’























































