
पनवेल महानगरपालिकेच्या विकासकामांतील निधीवाटप आणि टँकर खरेदीच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. टँकर खरेदीसाठी प्रस्तावित खर्च आणि शासकीय पोर्टलवरील दरांमध्ये मोठी तफावत आहे. टँकर २३ ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान मिळत असताना पालिका प्रशासनाने प्रत्येक टँकरचा दर ४७ ते ४८ लाख रुपये असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. किमतीत असलेली मोठी तफावत ही गैरव्यवहाराला खतपाणी घालणारी आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक लतिफ शेख यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर केला आहे.
पनवेल महापालिकेकडून २० पाण्याच्या टँकरच्या खरेदीसाठी प्रति टँकर ४७ ते ४८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र शासकीय पोर्टलवर १ हजार ते १० हजार लिटर क्षमतेचे टँकर सुमारे २३ ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत. या दोन दरांची तुलना करता प्रति टँकर २२ ते २५ लाख रुपयांपर्यंत तफावत असल्याचे शेख यांनी निदर्शनास आणले. टँकरची क्षमता, तांत्रिक वैशिष्ट्ये, उपकरणे, कर आणि देखभाल यांसारख्या बाबींची तुलना केल्यानंतरच प्रत्यक्ष दरातील तफावत स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या खरेदी प्रस्तावाची तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.
* महापालिकेच्या विकासकामांवर ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला असतानाही कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च करण्यात आली, याचा ठोस हिशोब प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा आरोप शेख यांनी केला.
गटारांच्या चेंबर दुरुस्तीकडे दुर्लक्ष
एका बाजूला कोट्यवधी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली जात असताना दुसरीकडे प्रभागातील गटारांची झाकणे आणि चेंबर बसवण्यासारखी मूलभूत कामेही होत नाहीत. गेल्या दोन आठवड्यांपासून ही कामे रखडल्यामुळे काही नगरसेवकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कामे करून घ्यावी लागत असल्याचा दावाही शेख यांनी केला आहे. शेख यांच्या आरोपांमुळे पनवेल पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.



























































