
सणासुदीच्या दिवसांतील फटाक्यांच्या बेसुमार आतषबाजीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र चिंता व्यक्त केली. फटाक्यांचा धर्माशी संबंध काय आहे? न्यायालय कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही. पण लोकांनी आत्मपरिक्षण करावे आणि फटाक्यांच्या वापराबाबत स्वतःहून सुरक्षित पद्धतींचा अवलंब करावा. न्यायालय धार्मिक भावना आणि पर्यावरणविषयक चिंता यात संतुलित दृष्टीकोन ठेवेल, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणीवेळी केली.
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या वायू प्रदूषणासंदर्भातील याचिकेवर सरन्यायाधीश सुर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सणासुदीच्या दिवसांतील फटाक्यांची आतषबाजी आणि धर्म यांच्यातील संबंधावर खंडपीठाने महत्वपूर्ण भाष्य केले. फटाक्यांचा धर्माशी काय संबंध आहे, असा प्रश्न न्यायर्म्ती बागची यांनी सुनावणीदरम्यान केला. त्यावर या प्रकरणातील अमिकस क्युरी असलेल्या ज्येष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. आपल्या नावामुळे लहान मुले आजारी पडत आहेत, त्यांना त्रास होत आहे हे जर देवांना समजले, तर त्यांनाही अत्यंत वाईट वाटेल, असा मुद्दा अॅड. सिंग यांनी मांडला. त्यांच्या या युक्तीवादाची खंडपीठाने गांभीर्याने नोंद करून घेतली.


























































