
मीरा-भाईंदर शहराचे ऐतिहासिक वैभव आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री धारावी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विरार, वसई, मुंबईसह मीरा-भाईंदर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने धारावी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
ऐतिहासिक परंपरेनुसार, नरवीर चिमाजी अप्पा यांच्या हस्ते श्री धारावी देवीच्या पाषाणमूर्तीची स्थापना करण्यात आली. १८६७ मध्ये तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट आर्ट यांनी देवीच्या मंदिरातील दिवाबत्तीसाठी वार्षिक अनुदान दिले होते. त्या काळात कस्टम विभागातील स्थानिक रहिवासी मंदिराची देखभाल करीत असत. या ऐतिहासिक नोंदींमुळे मंदिराच्या प्राचीन परंपरेचे महत्त्व आहे. १९७३ मध्ये राई, मुर्धा आणि मोर्वा येथील स्थानिक भूमिपुत्रांनी पुढाकार घेत मंदिराच्या जुन्या कौलारू वास्तूचा जीर्णोद्धार केला. नव्याने मंदिराचे नूतनीकरण करताना श्रद्धा, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला आहे.
उदे गं अंबे उदे – तिसरी माळ
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात यंदाही स्थानिक भजन मंडळांच्या भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या भक्तिगीतांनी आणि भजनांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच विविध भागांतील भाविक दर्शनासाठी येत आहेत. अष्टमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने होमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नऊ दिवस भजन सादर करणाऱ्या मंडळांना मंदिरात येण्यासाठी आणि कार्यक्रम झाल्यानंतर परत जाण्यासाठी वाहनांची सुविधाही ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती धारावी देवी मंदिर ट्रस्टचे सचिव रमेश पाटील यांनी माहिती दिली आहे.


























































