भाजपच्या मदतीने बंडखोर करणाऱ्या जगतापांचा धुव्वा; बारामतीत ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा वहिनींची सत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलने एकवीसपैकी अठरा जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले. भाजपच्या मदतीने बंडखोरी करणारे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल व युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अखेरच्या क्षणी नाटय़मय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पॅनेलमधील काही उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेत पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकवला. अवघ्या एका दिवसात त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांना सोबत घेत वेगळी चूल मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील मोठय़ा संस्थेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात अजित पवार गट सुरुवातीला काहीसा गाफील राहिला. परंतु जगताप यांच्या बंडानंतर त्यांनी जोरदार ताकद पणाला लावली. कारखान्याच्या प्रगतीत 1992 पासून अजितदादांनी दिलेले योगदान, त्यांच्या निधनानंतरही भावनिक साद, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेरच्या टप्प्यात घेतलेली आक्रमक भूमिका, खा. पार्थ पवार यांनी केलेले प्रचाराचे नियोजन, युवा नेते जय पवार यांनी गावोगावी-वाडय़ावस्त्यांवर जात केलेला प्रचार, पुरंदरमधून आमदार विजय शिवतारे यांची मिळालेली खमकी साथ या पॅनेलला विजयापर्यंत घेऊन गेली.