रायगड जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा कासव झाला, दीड वर्षात अवघे 20 टक्के काम; जून 27 ला लोकार्पण कसे करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा कासव झाला आहे. नूतन इमारतीच्या उभारणीसाठी १५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पण प्रत्यक्षात दीड वर्षाच्या कालावधीत केवळ २० टक्के काम झाले आहे. बांधकामाच्या कामाची गति लक्षात घेता जून २७ मध्ये रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन कसे करणार, असा सवाल रायगडवासीयांनी केला आहे. इमारतीचे काम संथ गतीने सुरू असल्याने त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

५ मार्च २०२५ रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. रायगडकरांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पाहिले जात आहे. मात्र आतापर्यंत जमिनीखालील पाइल पायाचे (फाउंडेशन) काम पूर्ण झाले असून तळमजल्यासाठी कॉलम उभारणीचे काम सुरू आहे. सात मजली इमारतीच्या तुलनेत झालेली ही प्रगति पाहता बांधकामाच्या वेगाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी ठेकेदाराला आतापर्यंत १३ कोटी ६० लाख रुपये देण्यात आले आहेत.

– नवीन इमारत सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने बांधण्यासाठी एमसीझेडएमए समितीची परवानगीच मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

– सुरवातीला नूतन इमारत उभारणीचे काम रखडले होते. एमसीझेडएमए समितीची परवानगी व रक्तपेढी स्थलांतर केल्यानंतर नूतन इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

300 खाटांचे रुग्णालय; अत्याधुनिक सुविधांचे नियोजन

नवीन इमारतीत एकूण ३०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये २० खाटांचे मोठे डायलिसिस सेंटर, १६ खाटांचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ३२ खाटांचा बालरुग्ण विभाग असणार आहे. याशिवाय अपघात विभाग, अपघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग आणि पाच स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग उभारण्यात येणार आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. मात्र या सर्व सुविधा रुग्णाल्याची इमारत पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहेत.

– रायगड जिल्हा रुग्णाल्याची नूतन इमारत सध्याच्या जागेतच उभारण्यात येणार आहे. सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या या सात मजली इमारतीसाठी १५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.