
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहनच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बससेवेचा दर्जा घसरत आहे. असे असताना प्रशासनाने मात्र बस भाडेवाढ करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन, वीज, सुट्टे भाग आणि देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण देत प्रशासनाने तिकीट दरात २ ते १२ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेत आणला जाणार आहे. दुसरीकडे एसी बसच्या भाड्यात मात्र ५ ते ३५ रुपयांपर्यंत कपात करण्याचे प्रस्तावित आहे.
मीरा-भाईंदर परिवहन उपक्रमाकडे ७४ डिझेल आणि ५७ इलेक्ट्रिक अशा १३१ बस आहेत. पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत आणखी १०० बस दाखल होणार असल्याने एकूण ताफा २३१ बसचा होणार आहे. मात्र बसची संख्या वाढत असताना नियमित देखभाल, दुरुस्ती आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचे आव्हान आहे. सध्याच्या बस खिळखिळ्या झाल्या आहेत. अनेक बस भंगार असूनही धावत आहेत. ब्रेकडाऊन, रस्त्यातच बस बंद पडणे असे प्रकार काही महिन्यांपासून वाढत असताना परिवहन सेवा सुधारण्याऐवजी प्रशासन प्रवाशांच्या माथ्यावर भाडेवाढ लादत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यापूर्वीही तिकीट दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे परिवहन समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावावर १६ ऑक्टोबरच्या महासभेत नगरसेवक काय निर्णय घेणार याकडे मीरा-भाईंदरवासीयांचे लक्ष लागले आहे.
– पहिल्या दोन किलोमीटरसाठी सहा ऐवजी आठ रुपये भाडे प्रस्तावित.
– २८ ते ३० किलोमीटरसाठी २६ ऐवजी ३६ रुपये भाडे प्रस्तावित.
– ३८ ते ४० किलोमीटरसाठी ३२ ऐवजी ४६ रुपये भाडे प्रस्तावित.
– साध्या बसचे सध्याचे तिकीट दर २०१३ तर एसी बसचे दर २०१६ पासून लागू.
अन्य पालिकांच्या तुलनेत दर अधिक
ठाणे, नवी मुंबई व वसई-विरार महापालिकांच्या तुलनेत मीरा-भाईंदरमधील एसी बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एसी बसचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या दोन किलोमीटरसाठी सध्याचे २० रुपये भाडे १५ रुपये, १० ते १२ किलोमीटरसाठी ५० रुपयांऐवजी २५ रुपये तर ३८ ते ४० किलोमीटरसाठी १०० रुपयांऐवजी ६५ रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.



























































